Thursday, April 23, 2020

लॉकडाऊन १ मधील ग्रामीण भारतातील जनजीवन
                                                          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 22 तारखेला एक दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला आणि त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इतर देशाच्या परिस्थितीचा विचार करता भारत सरकारने 24 मार्च 2020 ला 21 दिवसाच्या पहिला लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊन चा सकारात्मक परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत झाली. या 21 दिवसाच्या लॉकडाऊन चा देशातील  ग्रामीण भागातील जनतेवर कसा परिणाम झाला आहे हे पाहण्यासाठी संशोधकाने गुगल फॉर्म च्या माध्यमातून एक प्रश्नावली तयार केली व  ती व्हाट्सअप, ई-मेल व फेसबूक च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना वितरित करण्यात आली. या प्रश्नावलीच्या माध्यमातून 110 प्रतिसाद मिळाले. त्यामध्ये 45 पुरुष 65 महिला यांनी आपला प्रतिसाद नोंदविला. त्यामध्ये 20 वर्ष आलेल्या 48 मुला-मुलींनी, 21 ते 30 वय असलेल्या 27, 31 ते 40 वय असलेल्या 28 लोकांनी तसेच 41 पासून पुढे वय असलेल्या 7 लोकांनी आपला प्रतिसाद नोंदविला. आपणास 21 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये ग्रामीण भागातील जनता कशा पद्धतीने कोरोना ला सामोरी गेली हे लक्षात येईल. संशोधकाने अनेक प्रश्न त्यांना विचारले त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न  व  त्यांनी दिलेले  प्रतिसाद पुढील प्रमाणे.
प्रश्न क्र. 1. तुमचा पेशा काय?
    उत्तर: यामध्ये जवळ जवळ 59 विद्यार्थी, 14 नोकरदार, 24 शेतकरी, 6 गृहिणी, 7 व्यवसायिक असे एकूण 110 लोकांनी प्रतिसाद नोंदवला.
प्रश्न क्र. 2. तुमच्या घरात किती सदस्य आहेत?
    उत्तर: घरामध्ये 2 सदस्य आहेत अशी 6, 3 सदस्य आहेत अशी 10, 4 सदस्य आहेत अशी 37, 5 सदस्य आहे अशी 19,  5 सदस्यांत पेक्षा जास्त सदस्य अशी 38 एकूण 110 कुटुंबांनी आपला प्रतिसाद नोंदविला आहे. या वरून असे दिसते की ग्रामीण भागात ४ पेक्षा जास्त सदस्य असलेली कुटुंबे जास्त आहेत.
प्रश्न क्र. 3. कोरोना विषयी आपणास माहिती कोठून मिळाली?
   उत्तर: वर्तमान पत्र व त्यांच्या ॲप च्या माध्यमातून 20, टीव्ही न्यूज चैनल च्या माध्यमातून 61, सोशल मीडियाच्या माध्यमातून 19, तर सरकारी  GR माध्यमातून  5, व मित्र व नातेवाईकांच्या माध्यमातून 5 लोकांना कोरणा विषयी प्राथमिक माहिती मिळाली. या वरुन असे दिसते की टी.व्ही. व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना विषयी माहिती मालत आहे.
प्रश्न क्र. 4. कोरोना च्या यासंदर्भात तुमचे कुटुंब योग्य ते काळजी घेत आहे का?
   उत्तर: 100% होय. ग्रामीण भागातील जनता सुद्धा कोरोनाच्या बाबतीत योग्य ती दक्षता घेत आहे.
प्रश्न क्र. 5. 22 मार्च रोजी च्या जनता कर्फ्यू चे कडक पालन केले का?
   उत्तर: 100% होय. देशामध्ये २२ मार्च ला जो जनता कर्फ्यू घोषित केला त्याचे ग्रामीण भागामध्ये सुद्धा काटेकोर पाने पालन झाले होते.
प्रश्न क्र. 6. सरकारने घोषित केलेल्या 21 दिवसाच्या लॉकडाउन बद्दल तुम्ही समाधानी आहात ?
   उत्तर: 21 दिवसाच्या लॉकडाउन बद्दल ग्रामीण भागातील फक्त 17% लोक असमाधानी तर   83% जनता समाधानी आहे.
प्रश्न क्र. 7. 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये आपण काय केले?
   उत्तर: यामध्ये 27% प्रतिसाद देणार्‍यांनी अभ्यासाबरोबरच, घराच्या कामात मदत करणे, टीव्ही पाहणे याला प्राधान्य दिले तर, 64 % लोकांनी शेतामध्ये काम करण्यावर भर दिला व त्याबरोबर जनावरांना चारा व त्यांची निगा राखणे तसेच इतर कामात मदत करणे. तसेच 9% लोकांनी टीव्ही पाहणे व मोबाईलचा वापर करण्यावर प्राधान्यक्रम दिला. म्हणजेच ग्रामीण भागातील जनतेने शेतातील कामे करण्यावर भर दिल्याचे दिसते. त्याबरोबरच जे विद्यार्थी आहेत ते सध्या काही प्रमाणात अभ्यास
प्रश्न क्र. 8. 21 दिवसांमध्ये काही अडचणी आल्या का?
    उत्तर: 84%  लोकांना अडचणी आल्या तर 16 % लोकांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. यावरून आपणास असे दिसते की ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
प्रश्न क्र. 9. लॉक डाऊन च्या काळात काही पुस्तके वाचली का?
   उत्तर: 51% लोकांनी पुस्तके वाचली नाहीत व 49% लोकांनी पुस्तकांचे वाचन केले त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत. विद्यापीठीय परीक्षा संदर्भात अध्याप कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे त्यांनी आपला काही प्रमाणात अभ्यास सुरु ठेवला आहे मात्र त्यांचे असेही म्हनणे आहे की त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
प्रश्न क्र. 10. तुमच्या कुटुंबास वित्तीय अडचण आली का?
   उत्तर: 57% लोकांना अडचण आली नाही मात्र 43 % लोकांना वित्तीय अडचणींना सामोरे जावे लागले आहे. या वरून असे दिसते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या मदतीचा लाभ ग्रामीण जनेतला झाला आहे मात्र काही प्रमाणात लोकांना वित्तीय अडचनींना सामोरे जावे लागले आहे.
प्रश्न क्र. 11. तुमच्या गावात भीतीचे वातावरण आहे का?
उत्तर: 98% लोकांच्या मते त्यांच्या गावामध्ये भीतीचे वातावरण आहे तर  8% च लोकांना वाटते की त्यांच्या गावात भीतीचे वातावरण नाही.
प्रश्न क्र. 12. तुमच्या घरातील सदस्यांची मानसिक स्थिती स्थिर आहे का?
उत्तर: 76% लोकांच्या मते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती स्थिर आहे व 24% लोकांच्या मते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती स्थिर नाही.
प्रश्न क्र. 13. तुमच्या कुटुंबाला राशन समस्या होती का?
उत्तर: 79%  लोकांच्या कुटुंबाला राशन ची समस्या भेडसावली नाही व 21% लोकांना मात्र राशनच्या समस्येला तोंड द्यावे लागले. या वरून असे दिसते की केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपयोजनांची ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे.
प्रश्न क्र. 14. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या धोरणांबाबत आपण खुश आहात का?
     उत्तर: 98% लोक केंद्र व राज्य सरकारच्या योजना व अंमलबजावणी वरती खूष आहेत. फक्त 2% टक्के च लोक नाखूष आहेत.
प्रश्न क्र. 15. लॉकडाऊन च्या काळात आपण इतर कोणाला मदत केली का?
     उत्तर: 67% लोकांनी लॉकडाउन च्या काळात इतरांना मदत केली व 33% लोकांनी कोणत्याही स्वरुपातील मदत केलेली नाही. यातून ग्रामीण भागातील जनतेमध्ये इतरांना मदत करण्याची जी आत्मीयता असते ते दिसून येते.
प्रश्न क्र. 16. तुम्ही 21 दिवसांमध्ये योगा केला आहे का?
     उत्तर: 37%  लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी योगा केला व 63% लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी अजिबातच योगा केलेला नाही. मोजकेच लोक योगा आणि व्यायाम करतात असे या वरून आपणास दिसते.
प्रश्न क्र. 17. तुम्ही दूरदर्शन वरील रामायण मालिका पाहता का?
उत्तर:  75% लोकांच्या मते रामायण मालिका ते नियमित पाहतात  मात्र 25% लोक रामायण मालिका पाहत नाहीत. 90 च्या दशकामद्ये आणि जेव्हा प्रथमच कलर टी.व्ही. भारतात सुरु झाला होता. मात्र त्या काळी टी.व्ही. सेट फार कमी लोकांकडे असायचा, रामायण पाहायला मिळायचे नाही, रामायण हि मालिका त्याकाळी सर्वात लोकप्रिय होती. दूरदर्शन ने या लॉकडाउन च्या काळात त्याचे पुनः प्रसारण करून ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजन केले आहे.
प्रश्न क्र. 18. तुम्ही डीडी भारती वरील महाभारत मालिका पाहता  का?
      उत्तर: 62% लोक महाभारत पाहतात व 38% लोक महाभारत पाहत नाहीत. महाभारत हि मालिका सुद्धा 90 च्या दशकातील आहे, हि मालिका सुद्धा तितकीच लोकप्रिय होती. त्याचे हि या लॉकडाउन च्या काळात पुनः प्रसारण केल्यामुळे लोकांचा चांगलाच विरंगुळा व वेळ व्यथित झाला.
प्रश्न क्र. 19. लॉकडाउन बाबतीत तुमचे मत काय?
उत्तर:  लोकांनी आपली मनोगते मांडली ती पुढील प्रमाणे - घरात राहणे व  सुरक्षित असणे त्याबरोबरच आपले छंद जोपासावे, सरकारने घेतलेला निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असून लोकांनी घरांमध्येच राहून सहकार्य करावे तसेच डॉक्टर नर्स यांचे धन्यवाद, काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे हेच सध्या च्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचे आहे, सर्वांसाठी लॉक डाऊन हा अतिशय महत्त्वाचा आहे, सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे, लॉक डाउन केल्यामुळे आम्ही समाधानी आहोत, यामधून एक सकारात्मक मिळाले की मानवाला जास्त कशाची गरज नसे त्याने कुटुंबास वेळ घालवणे हे गरजेचे असते,  लॉकडाऊन हा देशासाठी महत्त्वाचा असून आपण सर्वांनी त्याचे पालन करणे गरजेचे आहे, ग्रामीण भागामध्ये लॉकडाउन हा काही प्रमाणामध्ये स्थितीतील करण्यात यावा, सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्याबद्दल सरकारचे धन्यवाद, विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा व व्यापाऱ्यांनी त्यांचे शोषण करणे थांबवले पाहिजे. शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. काहींचे असे म्हणणे आहे की जोपर्यंत कोरोना पूर्णपणे हद्दपार होत नाही तो पर्यंत लॉकडाऊन सुरूच ठेवावा. एकूण परिस्थितीचा विचार करता जेथे कोरोरणाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथे लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा.


20. समारोप: -
       देशाच्या ग्रामीण भागामध्ये जरी कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नसला तरी ग्रामीण जनतेमध्ये कोरोनाविषयी भीती आहे. सध्या ग्रामीण भागातील लोक शेतामध्ये करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामध्ये पाळीव प्राण्यांची निगा राखन्याबारोबरच त्यांची काळजी घेण्यावर भर आहेत्याबरोबरच टी.व्ही. पाहणे, मोबाईल चा वापर करणे, रेडीओ ऐकणे, मित्र व नातेवाईकांना फोन करणे, शेजार्यांशी चांगले संबध प्रस्थापित करणे, एकमेकांना सहकार्य करणे इत्यादी गोष्टीवर भर देत आहेत. शाळकरी मुला मुलींमध्ये हि भितिचे वातावरण असल्याने त्यांचे अभ्यासात मन लागत नाही ते सुद्धा शेतीच्या कामात हातभार लावत आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा जनतेला वित्तीय तसेच राशन च्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेती माल मागणी व वाहतुकीच्या व्यवस्थे अभावी मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामध्ये द्राक्ष, केली, गोबी-फ्लॉवर, टोम्याटो, गवार, वांगी, भेंडी, कलिंगड, टरबूज, कारले-दोडके, मिरची, पाले भाज्या, आणि इतर पिके घेणाऱ्या शेतार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र शासनाने शेतकरी योजनेंतर्गत रुपये 2000 हजार दिले असले तरी ते एकूण नुकसानीचा विचार करता खूपच कमी आहेत, मात्र शेतकरी मात्र सध्या सरकारच्या बाबतीत समाधानी आहेत व त्यांना एक अशा आहे की सरकार लावारच नवीन कर्जपुरवठा करेल. सध्या ग्रामीण भागातील जनता सुद्धा रामायण व महाभारत सारख्या मालिका मोठ्या प्रमाणावर पाहून आपला वेळा घालवत आहेत. देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या कालावधी मध्ये ग्रामीण जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन काही सकारात्मक निर्णय घेतील. सध्या आपण सर्वजण सरकारच्या आदेशांच व सूचनांच पालन करूया.
घरातच राहूया आणि कोरोनाला हारउया.!!
शेती व्यवस्था आहे म्हणून शेतकरी आहे.
शेतकरी आहे म्हणून शेतमाल पिकत आहे.
शेतमाल पिकत आहे म्हणून जीवन आहे.
जीवन आहे म्हणून मानवव्यवस्था आहे.
मानवव्यवस्था आहे म्हणून व्यवसाय आहे.
व्यवसाय आहे म्हणून उद्योग-धंदा आहे.
उद्योग आहे म्हणून रोजगार व अर्थकारण आहे.
अर्थकारण आहे म्हणून देशाची अर्थव्यवस्था आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करायचा असेल तर जो शेती हा या सर्वांचा मूळ पाया आहे त्यालाच प्राधान्याने मजबूत केले पाहिजे.
लेखक:
श्री. एन. डी. बनसोडे
सहाय्यक प्राध्यापक,
सद्गुरु गाडगे महराज कॉलेज, कराड
९८९०५३३२७६
ईमेल: nbanasode@gmail.com

Sunday, April 5, 2020

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची आर्थिक कोंडी

      आज भारत देशासमोरच नव्हे तर संपूर्ण जगासमोर 'कोरोना' नावाच्या विषाणूने गेली दोन ते अडीच महिने मोठे संकट उभे केले आहे. जगभरातील विकसित देश सुद्धा या संकटामुळे पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये या विषाणूने मोठे थैमान घातल्याचे दिसते. भारत सरकारने सध्या संपूर्ण देशामध्ये एकविस दिवसाचा पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊन काळामध्ये मागणीचे प्रमाण कित्येक पटीने घटले आहे. त्यामुळे मोठे उद्योग हे पूर्णपणे कोसळण्याची भीती आहे. तसेच त्यांना नवीन ऊर्जा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला काही महत्वाच्या योजना आखाव्या लागतील. संपूर्ण देशामध्ये या लॉकडाउन विषयी तर्कवितर्क मांडले जात आहेत. मात्र खऱ्या अर्थाने देशाची लोकसंख्या पाहता लॉकडाऊन हा यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. देशातील राज्य सरकार सुद्धा आपापल्या परीने या महामारी वरती उपाय म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. देशामध्ये सेवा क्षेत्राबरोबरच निर्मिती क्षेत्रावर सुद्धा मोठे अरिष्ट आल्याचे दिसून येत आहे. या लॉकडाउन नंतर अनेक उद्योग हे आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० ते १५ टक्के कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील कालावधीमध्ये बेकारीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. या संकटामध्ये सध्या महाराष्ट्र राज्य सरकार अतिशय चांगली भूमिका बजावत आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब अतिशय विनम्रपणे, संयमाने, धीराने, कल्पक व बुद्धीने सर्वच स्तरातील अधिकाऱ्यांना, व्यापारी वर्गाला,  कामगारांना तसेच शेतकरी वर्गांना एक प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी वारंवार जनतेसमोर म्हणजेच मीडियासमोर येऊन परिस्थितीचा आढावा व घ्यावयाची दक्षता या विषयी विचार मांडताना दिसतात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये संघटित क्षेत्रापेक्षा असंघटित क्षेत्रामध्ये रोजगार करणाऱ्यांची संख्या तुलनेने कित्येक पटीने जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून सरकारच्या वेगवेगळ्या आस्थापनांच्या असू द्या किंवा इतर क्षेत्रामधील नोकर भरती हि फार कमी झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये करार (Contract) तत्वावर तसेच रोजंदारी (Daily Wages) या उपक्रमाखाली अनेक लोकांची नेमणूक केली जाते, मात्र ही नेमणूक निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असते. तसेच या उपक्रमांतर्गत आठवड्यातील पाच दिवस रोजगार त्यांना मिळतो. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक शैक्षणिक संस्थांमधील महाविद्यालये, महानगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच खासगी बँका, विद्यापीठे, हॉस्पिटल्स, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, हॉटेल्स या आणि इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे हे सर्वजण असंघटित कामगार आहेत. बऱ्याच विभागामध्ये काम करणाऱ्या कामगारांची नोंद ही सरकार दरबारी ठेवली जात नाही, कारण अशा कामगारांना कायमस्वरूपी कामासाठी  दावा करता येऊ नये. तसेच त्यांनी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू नये ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. कारण सर्वच क्षेत्रातील हे कामगार आज ना उद्या आपण कायमस्वरूपी होऊ या आशेने काम करत आहेत. अशा परीस्थीतीमध्ये निश्चित किती प्रमाणामध्ये असंघटित कामगार आहेत यांची आकडेवारी मिळू शकनार नाही. यामध्ये फिटर, वेल्डर, सुतार काम करणारे, दुकानात काम करणारे, ड्रायवर, वेटर, कारकुनी करणारे, तासिका तत्वावर व विनानुदानित संस्थेत शिकविणारे प्राध्यापक, शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, फळे व भाजी विकणारे,  मात्र राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांची राहण्याची व जेवणाची सोय केली हि बाब अत्यंत महत्वाची होती. मात्र इतर क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांवर सध्याच्या  परिस्थितीमध्ये उपासमारीची वेळ सुरू आहे. अशा लोकांसाठी सरकारने निश्चित अशा स्वरूपाची योजना आखणे गरजेचे आहे. त्यांनाही कमीत कमी या अपातकालीन परिस्थितीमध्ये ५००० ते १०००० हजार रुपये प्रति महिना मिळावा. त्यातून त्यांना राशन असेल, घरभाडे असेल, कर्जाचे हप्ते असतील व इतर खर्च भागतील अशी योजना असली पाहिजे. मात्र या परिस्थितीमध्ये जे संघटित कामगार आहेत ज्यांचा पगार मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशा सर्व व्यक्तींनी सामाजिक जाणीव म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी यामध्ये सरळ हाताने मदत करणे गरजेचे आहे, शिवाय ही मदत अशा सर्व लोकांना आयकरातून सूट मिळविण्यासाठी फायद्याची ठरू शकते. येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे संकट उत्पन्न होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र सरकार आणि नागरिकांनी हतबल न होता मोठ्या संयमाने व धैर्याने पुढील मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.
         सध्याच्या स्थितीमध्ये लोकांनी काटकसर व अवाढव्य खर्च टाळणे, तसेच स्वतःच्या व कुटुंबियांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. आपण आशा व खात्री करूया की लवकरच 'कोरोना'  विषाणूमुक्त महाराष्ट्र व देश होईल. या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अनेक लोकांचे म्हणजे ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांचे काम गेले आहे. त्यांना आपण व सरकारने मदत करणे गरजेचे आहे. यानंतरच्या कालावधीमध्ये उद्योजकांनी, व्यापाऱ्यांनी, तसेच मोठ्या व्यवसाय मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लगेच कामावर घ्यावे. तसेच हॉटेल्स, हॉस्पिटल्स, मोठी दुकाने, वाहतूक सेवा, मोठे शेतकरी या सर्वांनी रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. कारण भारतामध्ये संघटीत क्षेत्रापेक्षा असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या तुलनेने प्रचंड आहे. वरील सर्व परिस्थिती पाहता सध्याच्या स्थितीमध्ये असंघटित कामगार यांच्यावरती मोठे आर्थिक संकट आल्याचे दिसून येत आहे. सरकारने यावरती उपाय म्हणून असंघटित कर्मचाऱ्यांचा लवकरच सर्वे करून त्यांना आर्थिक मदत करणे अत्यावश्यक आहे. तरच आर्थिक परिस्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकेल.

लेखक:
श्री. एन. डी. बनसोडे
सहाय्यक प्राध्यापक,
सद्गुरु गाडगे महराज कॉलेज, कराड
९८९०५३३२७६
ईमेल: nbanasode@gmail.com

Thursday, March 26, 2020

Stay Home
Stay Safe up to 15th April 2020.
We support our family, society and finally our Nation.
We follow the guidelines of State and Central Government.

We fight against Covid-19

We definitely win on Corona.

Today Central Government announced the special package to every sector.

Thank you Mr. PM Sir

लॉकडाऊन १ मधील ग्रामीण भारतातील जनजीवन                                                           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 22 ...